Feb 19, 2015

बस प्रवास - एक आनंदयात्रा

असे म्हणतात कि आयुष्य हाच एक सुंदर प्रवास आहे तरीही प्रत्येक वेळी माणूस प्रवास करतो आपली ध्येय उद्दिष्टे गाठण्यासाठी ,हवामान बदल होण्यासाठी, मनोरंजनासाठी , नातेवाईकांच्या भेटीसाठी  तर कधी यात्रेसाठी .
                   सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात बस/एस. टी  प्रवास हाच एक मोठा प्रवास असतो . मोठे झाल्यावर हाच प्रवास यशाची उद्दिष्टे गाठण्यासाठी विमान /कार प्रवास होतो तरीही बस प्रवासाशी असलेले  नाते टिकून राहते आयुष्यभर अगदी तसेच. या बस प्रवासाची पण एक गंमत असते. इथे प्रत्येक माणूस हा एक साधा प्रवासी असतो . Economy class, business class असे काही नसते. reservation  करून आपली जागा राखीव करणे याचाच एक मोठा आनंद असतो. गर्दी असेल (ती बहुतेक वेळा असतेच) तर जरा सरकून घ्या असे म्हटल्यावर वैतागून का होईना बसलेले लोक इतरांना बसायला जागा देतात आणि ३ आसनाच्या जागी ४/५ प्रवासी बसून बस  एकदा सुरु होते . काही जण  उभ्याने प्रवास करणारे देखील असतात. allrounder या शब्दाचा अर्थ conductor कडे पाहून कळतो. एकाच वेळी ticket घेणे , घेतलेले पैसे सांभाळून ठेवणे , सर्वांनी ticket घेतले आहे कि नाही याची खबरदारी घेणे घेणे इतकेच नव्हे तर कधीतरी प्रवाश्यांची भांडणे सोडवणे , गर्दी असताना न  कंटाळता पुढे चला , दोन रांगा करा हा सतत चा घोशा  लावणे हि सगळी कामे तो उत्तमरीत्या पार पाडतो. हे सगळे पाहत असताना अर्धा तास निघून जातो.
                  आणि  सुरु झालेली हि गाडी  वेग  घेते आपल्या इच्छित स्थळी पोचण्यासाठी. प्रवास चालू असताना बसायला खिडकी शेजारची जागा मिळणे या सारखा दुसरा मोठा आनंद नाही . सभोवतालचे सौंदर्य बस मधून जेवढे बघता येते तितके इतर वाहनांमधून अनुभवता येत नसेल असे मला तरी मनापासून वाटते. दिवसा प्रवास करत असू तर सूर्य नारायण मधूनच आपला प्रकाशझोत आपल्या डोळ्यांवर टाकतात. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे उगीचच आपल्याशी स्पर्धा करतात आणि मिळतो तो त्यांना मागे टाकल्याचा आनंद. ढगाळ वातावरणात कापसासारखे असणारे ढग चक्क आपल्या बरोबर प्रवास करतात आणि घाटातून जाताना तर डोंगराच्या माथ्याला ते स्पर्श करत्यात असे वाटते. घाटातून जाताना एका बाजूला असलेली खोल दरी आणि दुसऱ्या बाजूचा डोंगर निसर्गाचा अविष्कार काय हे अगदी सोप्या पद्धतीने सांगतात . मधूनच घाटातील दगडांच्या फटीतून वळवळणारा  भुजंग दिसतो . अनेक प्रकारचे पक्षी किलबिलाट  करून प्रवासाची रंगत वाढवतात. दरीतून दिसणारे धबधबे डोळ्यांना भुरळ पडतात. दरीत दिसणारे घरे एकदम छोटी दिसतात. हाच रात्रीचा प्रवास असेल तरीही तो रंगत आणतोच. संपूर्ण शहर झोपलेले असताना (आपण  झोपले नसू तर :)) आपण मात्र बाहेरची गंमत बघत असतो . असंख्य चांदण्या आणि चंद्र आपली सोबत करतात. सगळीकडे अंधार असला तरी झाडांच्या सावल्याना मात्र आपण मागेच टाकत असतो. घाटातून जाताना रातकिड्यांचा आवाज सोबतीला असतो. घाटाच्या मध्यभागी पोचल्यावर खुपसे दिवे दिसतात असे वाटते कि हे आपले छोटेसे  Empire State कुठलीही बिल्डिंग न बांधता तयार झालेले.
                  कुठल्या हि भागातून प्रवास केला तरी बस आपल्याला स्थानीक  जिवनाचे दर्शन घडवते. कोकणातून प्रवास करत असू तर उतरत्या छप्पर असलेली कौलारू घरे,गायी - म्हशीचे गोठे , तांदूळ आणि नाचणी ची शेते आणि साध्या राहणीतील कोकणी माणसे. पठारी प्रदेशातून प्रवास केला तर तर याच कौलारू  घरांची धाब्याची घरे होतात आणि शेते गहू आणि ज्वारी ची . थंड प्रदेशात प्रवास केला तर सगळीकडे बर्फ च बर्फ असतो अगदी स्वच्छ कापूस पसरून ठेवला आहे असे वाटेल असा आणि त्याच प्रदेशात जर वसंत ऋतूमध्ये केला तर निसर्गाची नवनिर्मिती  दाखवणारा ."वसंत ऋतू आणि  बहरलेली सृष्टी" या ओळींचा अर्थ याची देही याची डोळा पटवणारा.
                   थोडक्यात काय तर असा हा बस प्रवास जमिनीवर राहणे आणि उंचीवर पोचणे याची योग्य सांगड घालणारा. त्याला विमान प्रवासा सारखी आभाळा एवढी उंची लागत नाही आणि आणि कार प्रवास सारखे मी आणि माझे इतके धरून जमिनीच्या जास्त जवळ पण नाही. तो नेहमी करत राहावे. सह्प्रवाश्यांशी मैत्री करावी आणि जमलेच तर हॉटेल मध्ये जेवल्यावर टीप देतो त्या प्रमाणे driver ला हि देऊ शकतो टीप म्हणून नाही तर इतके अंतर आपल्याला सुरक्षित आणल्याबद्दल. 

No comments: