Aug 20, 2014

मला एकदा खरेखुरे अमेरिकन व्हायचंय


अमेरिकेत येऊन आता मला सहा महिने पूर्ण झाले. एव्हाना भारतीय नातेवाईक आणि इतर मित्रमंडळी यांच्या दृष्टीने आपण अमेरिकन झालेलो असतो. (शब्दशः ग्रीन कार्ड होल्डर नव्हे) इथे मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी असते.

मोठा प्रवास करून आपण वास्तव्याचे ठिकाण बदलतो पण मनाने मात्र आपले भारतीय असतो आणि ते मात्र सोडायला कधीच तयार नसतो. म्हणूनच इथे राहणारे बहुतांशी भारतीय फक्त भारतीय लोकांच्या विश्वात रमणारे आढळतात. इतकेच नव्हे तर भारतीय संस्कृती, राहाणी आणि एकूणच भारत विषयी त्यांचे प्रेम उफाळून आलेले असते म्हणून कुठेही समारंभ किंवा वाढदिवस इ. गोष्टी  असतील तर तिथे भारत कसा चांगला आहे आणि अमेरिकन गोष्टी बद्दल बऱ्याच वेळा
 नकारात्मक विचार ऐकू येतात. 

किती ही झाले तरी दोन वेगळ्या संस्कृती असतील तर एक अदृश्य भिंत तयार होते म्हणून कदाचित दोन वेगळ्या संस्कृती कधी एक होत नसाव्यात. ही भिंत जरी अदृश्य असली तरी तिथे जायचा रस्ता मात्र सापडत नाही. काही अपवाद असतील पण ते शेवटचा टप्पा गाठत असतील किंवा नाही याबाबत शंका वाटते. एकदा परदेशातील भूमीवर पाय टाकला कि त्या क्षणी तुम्ही बदलता. आता पर्यंत असलेल्या तुमच्या सांस्कृतिक ज्ञान ला काही महत्व उरत नाही. इथे त्यांची संस्कृती डॉलर आणि आपली म्हणजे रुपया असे होते. आजपर्यंत मला सगळी स्तोत्रे पाठ आहेत, पु. लं ची सगळी पुस्तके वाचली आहेत, नोकरी करणारी तरीही सातच्या आत घरात येणारी या सगळ्या गोष्टींचा अभिमान बाळगणारी मी कुणी रॉबिन विल्यम बद्दल विचारले तर गोंधळून जाते. अनेक शब्द्जंजाळ असलेली इंग्रजी वाक्ये ऐकली कि आपल्याला हे का सुचले नाही हे याबद्दल खंत वाटते. अनेक इंग्लिश लेखक आणि कवींची नावे ऐकली कि हे पहिल्यांदीच ऐकले आहे असे वाटते. म्हणून च अमेरिकेत येऊन सुधा ERNEST HEMINGWAY  पेक्षा मी मराठी पुस्तकान मध्ये जास्त रमते. किंबहुना वेळ जास्त उपलब्ध झाल्यामुळेच मराठी पुस्तकांच्या जास्त जवळ पोचते.

म्हणून च मला इथल्या प्रत्येक सामान्य माणसाची सावली व्हायचंय. शेजारी राहण्र्या बाई च्या स्वयंपाक घरात जायचय. इथले आई, बाबा, मित्रा,बहिण ,भाऊ अशी सगळी नाती जवळून बघायची आहेत. किती ही रागावली तरी आवडीचा खाऊ देणारी आई किंवा किती ही रागावले तरी उशीर झाल्यावर आणायला येऊ का विचारणारे बाबा इथे ही असतील का हे प्रत्यक्ष बघायचे आहेत. मला त्या अदृश्य भिंतीमध्ये दार शोधायचं आहे. म्हणून च मला एकदा खरेखुरे अमेरिकन व्हायचे आहे.

No comments: